loader image

About Us

(मंदिराचा त्रोटक इतिहास)

श्री आत्मारामबुवा हे शिरगाव मठातील रामदासी संप्रदायाचे एक भक्त होते. सावंतवाडी, गोवा, अहमदाबाद वगैरे ठिकाणी मंदिरे उभारल्यानंतर हे शके १७५० (सन १८२८) साली मुंबईस आले. त्यांनी आपल्या शिष्यगणांकडून वर्गणी जमविली. या शिष्यात विशेषतः पाठारे प्रभु ज्ञातियांचाच समावेश होता. त्या वर्गणीच्या साह्याने गिरगांव रस्त्यावर काही जागा विकत घेऊन त्या जागी श्रीराममंदिराची उभारणी भाद्रपद शुक्ल १२ शके १७५० – २० सप्टेंबर १८२८ रोजी केली. त्या देवालयात श्रीराम पंचायतनाची विधीपूर्वक स्थापना करून त्या जागेस ‘ठाकूरद्वार’ असे नाव दिले.

 

सन १८३६ साली आत्मारामबुवांचे वय सुमारे ९० वर्षांचे होते. वृद्धावस्था प्राप्त झाल्यामुळे देवळाच्या योग्य व्यवस्थेबद्दल त्यांना काळजी वाटून काही तजवीज करून ठेवावीशी वाटत होती. म्हणून त्या वर्षाच्या जुलै महिन्यात श्रीयुत लक्ष्मण हरिश्चंद्रजी (उर्फ भाऊ रसेल ) वासुदेव विश्ववनाथ, काशिनाथ मोरोजी, बाळकृष्ण वासुदेवजी व राघोबा गोविंदजी या गृहस्थांना देवळाचे ट्रस्टी म्हणून नेमले. हे सर्व गृहस्थ पाठारे प्रभु ज्ञातीचे असून बुवांचे शिष्य होते. 

श्री आत्माराम बुवांनी विकत घेतलेली जमीन देवळास अपुरी होती. म्हणून पाठारे प्रभु ज्ञातीतील एक गृहस्थ जीवबा बाळाजी यांची विधवा पत्नी कावेरीबाई हिची जमीन वरील विकत घेतलेल्या जागेस लागून होती. त्यातून काही भाग दरमहा ५/- रुपये भुई भाड्याने तिजपासून घेण्यात आली. नंतर कावेरी बाईंनी भुईभाड्याने दिली. ऑगस्ट १८४१ मध्ये त्यांनी दानपत्र करून ती जागा कायमची देवळास देणगी म्हणून दिली. 

सन १८७० साली श्रीकृष्ण ठाकूरदास बुवांनी हल्ली दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना दिलेल्या पादुकांची स्थापना केली, त्यासंबंधीचा उल्लेख श्रीगुरुलीलामृत अध्याय ३३व्या ओव्या ४४, ४६, ४८ व ४९ मध्ये आहे. 


सन १८७० साली दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागी अक्कलकोट स्वामींच्या पादुका, विठ्ठल रखुमाई व गणपती यांच्या मूर्ती व शिवलिंग यांची स्थापना केली.

हे देऊळ नव्याने बांधण्यात आले आणि त्याच नवीन मंदिरात श्रीमती यशोदाबाईंनी दिलेल्या संगमरवरी दत्तमूर्तीची स्थापना दि. २१ जून १९०८ रोजी विधीपूर्वक करण्यात आली.

सन १९११ साली राममंदिरातील सभा मंडपाचे वरील मजल्याला लागून व पायऱ्यांच्या वरील बाजूस नौबतखाना बांधण्यात आला.

 

 

 


 

देवळाच्या घुमटात एक शिवलिंग आहे. श्री आत्मारामबुवा ध्यानस्थ बसण्याचे वेळी या घुमटात बसत असत. या लिंगाच्या दर्शनासाठी दर श्रावणी सोमवारी सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत, तसेच महाशवरात्रीच्या दिवशी सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत आणि  वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्रौ ९ ते १२:३० वाजेपर्यंत दर्शसास मंदिर खुले ठेवण्यात येते.


error: Content is protected !!